सिल्लोड तालुक्यातील विहीरी अधिग्रहित करुन तातडीने टँकर सुरू करण्याचे आ. अब्दुल सत्तार यांचे आदेश

Foto
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील ग्रामस्थांशी साधला संवाद

सिल्लोड, (प्रतिनिधी) : सिल्लोड - सोयगाव तालुक्यात दुष्काळाची गंभीर परिस्थिती निर्माण होत असून, पाणीटंचाईमुळे नागरिकांसह शेतकरी आणि पशुधनासमोर विविध समस्या उभ्या राहत आहेत. या पार्श्वभूमीवर टंचाईग्रस्त गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी विहीर अधिग्रहण व टैंकर सुरू करण्याची प्रशासकीय कार्यवाही तातडीने पूर्ण करून प्रत्यक्ष टैंकर सुरू करावेत, अशा सूचना माजी मंत्री तथा आमदार अब्दुल सत्तार यांनी तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांना दिल्या आहेत.

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आमदार अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड तालुक्यातील बोरगाव कासारी, तलवाडा, निल्लोड आदी गावांना भेटी देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला व त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. यावेळी ग्रामस्थांनी गावातील पाणीटंचाईसह दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या विविध समस्यांकडे त्यांचे लक्ष वेधले. 

पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना करावी लागणारी धावपळ लक्षात घेता, टंचाईग्रस्त गावांमध्ये आवश्यकतेनुसार टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

यंदाच्या दुष्काळी परिस्थितीचा शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेवरही परिणाम होत असून, पिकांचे नुकसान, जनावरांसाठी चारा व पाण्याची उपलब्धता आणि पशुधन जगविण्याचे आव्हान शेतकऱ्यांसमोर आहे. 

पाणीटंचाईमुळे जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनण्याची शक्यता आहे. त्यामुळे केवळ पिण्याच्या पाण्यापुरते मर्यादित न राहता, दुष्काळामुळे निर्माण होणाऱ्या सर्व समस्यांचा आढावा घेऊन आवश्यक उपाययोजना करण्याची गरज आहे.

गाव भेटीदरम्यान ग्रामस्थांनी मांडलेल्या समस्यांची दखल घेत आमदार अब्दुल सत्तार यांनी संबंधित यंत्रणेला पाणीटंचाई निवारणासाठी आवश्यक प्रशासकीय कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. तसेच दुष्काळामुळे नागरिक, शेतकरी आणि पशुधनाला भेडसावणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी परिस्थितीनुसार आवश्यक उपाययोजना करण्यावर भर दिला. याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नंदकिशोर सहारे, माजी उपनगराध्यक्ष विनोद मंडलेचा, युवा सेनेचे अक्षय मगर, प्रवीण मीरकर, रामदास साळवे, विजय खाजेकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.